एके काळी जनमाणसांची प्रतिमा असलेली काँग्रेस आज धुळीळा का मिळाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर एक अतिशय महत्वाची गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे काँग्रेसमध्ये असणारी घराणेशाही पद्धत. हि घराणेशाही पद्धत अगोदर अस्तित्वात न्हवती. लाल बहादूर शास्त्री यांच्या पर्यंत काँग्रेस पक्ष हा लोकशाही आणि विकेंद्रित असलेला पक्ष होता. पण 1966 नंतर म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांच्या आकस्मित मृत्यू नंतर काँग्रेसला वेगळेच वळण लागले होते. जो काँग्रेस पक्ष 1966 पर्यंत म्हणजे भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूपर्यंत लोकशाही व विकेंद्रित होता, तोच पक्ष लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यू नंतर लोकशाही व विकेंद्रित न राहता तो व्यवहारात एका व्यक्ती भोवती फिरणारा पक्ष बनला. 1969 मध्ये काँग्रेस पक्षामध्ये चमचेगिरी करणाऱ्यांचा उदय झाला. साधारणपणे 1969 पर्यंत काँग्रेस हा पक्ष लोकशाही पक्ष होता. स्वातंत्र्य आंदोलनातील महान नेते गोखले, टिळक , बोस, गांधी आणि इतर या सर्वांचेच निष्ठावान अनुयायी होते. मात्र जाहीरपणे त्यांनी खुशमस्करेगिरीचे प्रदर्शन नाही केले नाही. जवाहरलाल नेहरूंनी तर स्वतःला स्तुती पाठकांपासून नेहमी दूरच ठेवले होते.
जवाहरलाल नेहरू यांचे व्यक्तिमत्त्व गांधी घराण्यातील लोकांपेक्षा वेगळे होते. नेहरूंना स्तुती सुमानांची कसलीच हाव न्हवती.नेहरूंना चमचे अप्रिय होते. असा सार्वत्रिक समज असला, तरी नेहरूंनी घराणेशाहिला कधीच उत्तेजन दिले नाही.आपली मुलगी पंतप्रधान व्हावी ,अशी नेहरूंना ना इच्छा होती,ना आशा वा अपेक्षा .
नामवंत संपादक फ्रँक मोरायस यांनी त्यांच्या एका पुस्तकात 1960 साली लिहिले होते: 'स्वतःची घराणेशाही निर्माण करण्याचा प्रयत्न नेहरूंकडून होणे शक्य नाही. त्यांचा स्वभाव , व्यक्तिमत्त्व आणि आजवरचा प्रवास यांच्याशी ते विसंगत ठरेल. हे विधान सत्य असल्याचे प्रमाण रामचंद्र गुहा त्यांच्या पुस्तकात देतात.
1964 साली नेहरूंचे निधन झाल्यावर त्यांचे कडवे टिकाकार म्हणून ज्यांचा नावलौकिक होता ते डी.एफ.कारका यांनी , आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या बाबतीत स्वतःचा कोणताही कल व्यक्त न करण्याच्या नेहरूंच्या ठाम निग्रहाचे कौतुक केले होते. नेहरूंच्या मते , त्यांच्या पश्चात पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या नेत्यांचा हा विशेषाधिकार होता आणि त्यात त्यांनी कोणतीही भूमिका बजावली न्हवती, असे कारका यांनी नमूद केले होते. कारका यांच्या वरील विधानावरून नेहरू हे घराणेशाहीचे पुरस्कर्ते न्हवते असा निष्कर्ष निघतो. आता खरा प्रश्न उरतो तो काँग्रेसमधील घराणेशाहीचा. तिचा उगम कसा झाला.त्याला कोणत्या घटना कारणीभूत ठरल्या ? किंवा कोणत्या व्यक्ती घराणेशाहीला उत्तेजन देणाऱ्या होत्या ? कुठल्या व्यक्तीपासून घराणेशाहीला सुरवात झाली.
नेहरूंचे निधन झाल्यावर भारताचे नविन पंतप्रधान म्हणून लाल बहादूर शास्त्री यांची नियुक्ती झाली.
नवे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी इंदिरा गांधींना माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्रिपद दिले. गुणवत्ता वा क्षमता हे त्यामागील मुख्य कारण न्हवते, तर त्यांच्या वडिलांविषयीच्या आदरभावनेचा अविष्कार होता.जानेवारी 1966 मध्ये शास्त्रीचें आकस्मित निधन झाले आणि ध्यानीमनी नसताना इंदिरा गांधी पंतप्रधानपदी बसविल्या गेल्या.
पंतप्रधानपदासाठी त्यांच्यापेक्षा अधिक पात्रतेच्या व्यक्ती त्यांच्या पक्षात असताना देखील काँग्रेसमधील धुरीणांनी इंदिरा गांधी यांची पंतप्रधान म्हणून निवड केली. त्यांच्या दृष्टीने ती 'गुंगी गुडीया' होती. इतरांपेक्षा अशा स्त्रीवर आपण सहज नियंत्रण ठेवू शकू , असा त्यांचा हिशोब होता. पण त्यांचा हिशोब सपशेल चुकला.आधी कधीच न दिसलेले कणखर निर्दयीपणाचे दर्शन सत्तेतील इंदिरा यांच्यात दिसले. त्यांनी काँग्रेस मध्ये फूट पाडली, पक्षाचे नियंत्रण करणाऱ्या नेत्यांना बाहेरची वाट दाखवली आणि 'गरिबी हटाव' च्या घोषणेने स्वतःची 'गरिबांची मसिहा ' म्हणून प्रतिमा तयार केली. आणि एकेकाळी लोकशाही आणि विकेंद्रित असलेला पक्ष , व्यवहारात मात्र एका व्यक्ती भोवती फिरणारा बनला. इथून सुरू होते इंदिरा यूगाची. ज्या प्रकारे संपुर्ण भारत जसा मोदी केंद्रित झाला आहे, तसाच त्याकाळी संपूर्ण देश इंदिरा केंद्री झाला होता.
भारत म्हणजे इंदिरा असेच बोलले जात होते.2019 चे मोदी सरकार सुद्धा व्यक्तिकेंद्रीच आहे. म्हणजेच मोदी केंद्रित आहे. फक्त त्यात घराणेशाही नाही एवढाच फरक !
इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यापासून घराणेशाहीला सुरवात झाली. जो काँग्रेस पक्ष एकेकाळी लोकशाही आणि विकेंद्रित असलेला पक्ष होता , तो आता व्यवहारात एका व्यक्ती भोवती फिरणारा पक्ष बनला. आता वास्तवात इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात सत्तापदी जो बसेलला असेल त्याला तेथे टिकून राहण्यासाठी आमदार वा पक्षकार्यकर्ते यांच्या ऐवजी दिल्लीतील महिलेची मर्जी सांभाळावी लागणार होती. म्हणजे जो इंदिरा गांधी यांची मर्जी राखण्यात अपयशी होईल त्याला सत्तेपासून लांबच राहावे लागेल. त्यामुळे काँग्रेसमधील नेत्यांना पक्षातील कार्यकर्ते यांच्याशी एकनिष्ठ राहण्याऐवजी त्यांना पक्षातील श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तीशी एकनिष्ठ राहणे भाग पडत होते.
काँग्रेस पक्षातील नेत्यांना दिल्लीतील महिलेची म्हणजे इंदिरा गांधी यांची मर्जी राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती.यामुळे पक्षातील इतर कार्यकर्त्यांना दुय्यमपणे वागवले जात होते.
इंदिरा गांधी यांनी त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या दोन्ही मुलांना राजकारणात आणले. राजीव आणि संजीव हे इंदिरा गांधी यांचे दोन पुत्र. पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या राजीव यांनी विमान चालकाचा परवाना मिळवला आणि इंडियन एअरलाईन्सची नोकरी धरली. तर धाकटा भाऊ संजय याने रोल्स राईसमध्ये प्रशिक्षण घेतले.त्याला स्वतःचा मोटार उत्पादनाचा कारखाना काढायचा होता.पण यामध्ये संजय गांधी अपयशी ठरले. त्यांचा स्वतःचा मोटार उत्पादनाचा कारखाना काढण्याची त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. कारखान्याची बांधणी पूर्ण होण्याच्या अगोदरच त्यांनी 1975 मध्ये नवे क्षेत्र शोधायला सुरवात केली होती. अर्थात स्वतःच्या घरातच त्यांना ते सापडले. इंदिरा गांधी यांनी त्याच काळात नुकतीच आणीबाणी जाहीर केली होती आणि ती राबवण्यासाठी त्यांना जे पाठबळ हवे होते आणि ते देण्यासाठी संजय तत्परच होते. आणि त्यात ते सहभागी ही झाले.
आणीबाणी उठवली जाण्याआधीच संजय यांनी मोटार उद्योजक होण्याचा उरलासुरला बुरखाही फेकून दिला होता. त्यांनी दोन लोकसभा निवडणूक लढवल्या.काँग्रेसचे सरचिटणीस पद मिळवले. पक्षात आणि (जानेवारी 1980) पासून सरकार मध्ये ते आईचे उजवा हात झाले.
अशा प्रकारे काँग्रेस पक्षात गांधी घराण्याने घराणेशाही सुरू केली. आणीबाणी राबवण्यासाठी पक्षातुन मिळणारे पाठबळ इंदिरा गांधी यांना अपुरे पडत होते का, कि म्हणून त्यांनी त्यांच्याच मुलाला पाठबळ मागितले. इंदिरा गांधी यांनी संजयला जाणीव पूर्वक राजकारणात आणले. आणिबाणीच्या काळात संजय गांधी यांना राजकारणात आणून त्यांची राजकारणी किंवा नेता अशी प्रतिमा समाज मनांवर तयार करण्यात इंदिरा गांधी यशस्वी ठरल्या. पण त्याच वर्षी जून महिन्यात संजय यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.संजय गांधींच्या मृत्यू नंतर इंदिरा गांधी यांनी राजीव गांधींना राजकारणात आणले.संजय गांधी हयातीत असताना राजीव गांधी यांना राजकारणात कसलाच रस न्हवता. कोलकाता ते मुंबई मार्गावर बोईंग विमान चालवण्यापूर्तीच राजीव यांची महत्वकांक्षा मर्यादित होती. जून 1980 पर्यंत विमान चालक म्हणून त्यांनी 12 वर्षे घालवली असली, तरी त्यांच्या कामाची गुणवत्ता त्यांना हवी ती बढती देण्यास पुरेशी ठरत न्हवती. पुढे इंदिरा गांधी यांच्या मदतीने राजकारणात प्रेवश केल्यावर पाचच वर्षात ते देशाचे पंतप्रधान झाले. अशा प्रकारे आपल्या देशाची धुरा काँग्रेस पक्षाने एका विमानचालकाच्या हाती सोपवली. ज्या व्यक्तीला देशातील राजकारणाबद्दल , समाजव्यवस्थेबद्दल काहीही माहीत नसणारा व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला.राजीव गांधी हे वैमानिक म्हणूनही चांगली कामगिरी बजावू शकले नाही. त्यांनी विमानचालक म्हणून 12 वर्षे घालवली तरी त्यांच्या गुणवत्ते अभावी त्यांची बढती होत न्हवती. काँग्रेस पक्षाला इंदिरा गांधीनंतर दुसरा कोणीच योग्य व्यक्ती दिसला नाही का ? का फक्त राजीवगांधीच होते ? आज मला मागे वळून पाहताना अक्षरशः लाज वाटते.गांधी घराणे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांसाठी ग्रेट असतील पण माझ्यासाठी नाही.1984 सालचा माझ्या देशाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार किंवा पंतप्रधान हा एक विमान चालक होता.देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता फक्त एक विमानचालक होती. त्या व्यक्तीचे समाजासाठी , देशासाठी कुठलेच कर्तुत्व न्हवते.
जो व्यक्ती फक्त इंदिरा गांधी यांचा पुत्र होता म्हणून देशाचा पंतप्रधान झाला होता. घराणेशाहीला उत्तेजन द्यायला आपण सर्वजण कारणीभुत आहोत. जनता एवढी आंधळी होती याच्यावर विश्वास बसत नाही.काँग्रेस पक्षातील लोकांना राजीव गांधींपेक्षा जास्त कार्यक्षम असलेला त्यांच्या पक्षात दुसरा कुठला नेताच दिसला नाही का. कुठल्या भरवश्यावर जनतेने देशाला राजीव गांधी यांच्या हाती सोपवले काय माहीत. त्या काळातील जनताच आंधळी होती अस म्हणायला काही हरकत नाही. ती फक्त आंधळी न्हवती ती कानाने सुद्धा बहिरी असेल आणि विवेक तर बिलकुल नसेल. विमानचालकाच्या हातात देश सोपवून जनतेने कुठल्या तोंडाने हा व्यक्ती आपल्यासाठी चांगले दिवस आणिल याची अपेक्षा ठेवायची. आपले जीवनमान हा व्यक्ती सुधारेल असे म्हणायला सुद्धा काही आशा दिसत न्हवती.असो.....तो भूतकाळ होता .पण इथून पुढे तसे होणार नाही आणि आम्ही होऊही देणार नाही.पण फक्त त्याच्यासाठी देशातील नागरिकाने कुठल्याच व्यक्तीचे भक्त होता कामा नये.कुठल्याच पक्षाला पूर्णतः स्वामित्व देऊ नये. कुठल्याच व्यक्तीला देशापेक्षा मोठा मानू नये. नाहीतर देशाचे वाटुळे व्हायला वेळ लागणार नाही......... अशा प्रकारे फक्त घराणेशाहीमुळे राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. राजीव गांधी सुध्दा त्यांच्या आईप्रमाणे एकाधिकारशाही प्रवृत्तीचे होते.
काँग्रेसमध्ये नेतृत्व गुणांपेक्षा , [ मी लाल बहादूर शास्त्री यांच्या नंतरच्या काँग्रेस बद्दल बोलतोय ] तर काँग्रेसपक्षामध्ये नेतृत्व गुणांपेक्षा एखाद्या उच्च किंवा चांगल्या पदावर नेमणूक करण्यासाठी कर्तृत्वापेक्षा म्हणजेच कार्यक्षमतेपेक्षा व्यक्तिगत निष्ठाच निर्णायक ठरताना दिसते. इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसमधील केंद्रीय मंत्री असो नाहीतर मुख्यमंत्री असो यांना त्यांच्या पदावर कायम राहण्यासाठी , म्हणजेच त्यांचे पद टिकवण्यासाठी गांधीकुटुंबाच्याच मर्जीवर विसंबून रहावे लागत असे. निष्ठा राखण्याची ही प्रथा फक्त पक्षातील नेत्यांपूर्तीच न राहता ती नोकरशाही वर्गामध्ये सुद्धा चालू झाली.त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांचे गांधी कुटुंबाशी जवळचे नाते आहे , जे त्यांच्या मर्जीतले आहेत . त्यांचीच उच्च पदावर नियुक्ती होत असे.
तसे पहायला गेले तर ही निष्ठा राखण्याची प्रथा फक्त काँग्रेस पक्षापूर्तीच मर्यादित राहिली नाही.ही प्रथा इतर पक्षांमध्येही फोफावली आहे. अलीकडेच कालपरवा
2019 च्या लोकसभा निवडणुकीत बीजेपीला बहुमत मिळाले. याही मोदी सरकार मध्ये रामदास आठवले यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळाले. त्यावेळी रामदास आठवले वार्ताहरांशी बोलताना सांगत होते कि " मोदीजी केहते है आप पर फडनविसजी बहोत खुश हैं। फडणवीसजी केहते हैं आप पर मोदीजी बहोत खुश हैं। तो मै केहता हु आप दोंनो खुश तो मैं भी खुश " आता 'खुश' या शब्दाचा अर्थ जाणकार लोकांनी काढावा. रामदास आठवले यांची ह्या दोन नेत्यांच्या प्रति असलेल्या निष्ठेनेच त्यांना दुसऱ्यांदा मंत्री बनवले.असो विषयांतर होत आहे. आपण पुन्हा आपल्या मुद्यांकडे वळू.
काँग्रेस पक्षाच्या घराणेशाहीमुळेच भारताचे भवितव्यही अडचणीत आले.या घराणेशाहीमूळे भारताला योग्य प्रशासक भेटला नाही. या विरुद्ध ना कोणी आवाज उठवला , ना कोणी या घराणेशाही विरुद्ध बंड पुकारले. सगळेच जण एका व्यक्तीची मर्जी राखण्यातच धन्यता मानत होते.अलीकडे याच घराणेशाहीमुळे काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले.
रामचंद्र गुहा त्यांच्या "देशभक्त आणि अंधभक्त" या पुस्तकात असे म्हणतात कि [ "भारत ही घराणेशाही आधारित लोकशाही आहे, असे अनेकदा म्हटले जाते. वस्तूत : तिला 'दरबारी लोकशाही' संबोधणे योग्य होईल. विशेषतः काँग्रेस सत्तेवर असते, तेव्हा नवी दिल्लीतील वातावरण मध्ययुगीन राजमहाला सारखे असते, कट कारस्थाने आणि कानगोष्टी यांना येथे ऊत आलेला असतो.ज्यांना लाभाचे पद हवे असते ; ते राजा , राणी , राजपुत्र यांच्या जवळच्या वर्तुळात घुसण्याचा प्रयत्न करीत असतात.ज्यांनी आधीच ते मिळवले आहे, त्यांचा एकडोळा कामावर आणि दुसरा ते राखण्यासाठी कोणाला कसे खुश ठेवायचे , याकडे लागलेला असतो. ]
पुढे राजीव गांधीनंतर काँग्रेस पक्षातील नेत्यांना वर्षातून दोनदा , म्हणजे राजीव गांधी यांच्या जन्मदिनी आणि मृत्यूदिनी वृत्तपत्रांच्या पानातून त्यांना त्यांची निष्ठा सिद्ध करावी लागत असे. म्हणजे आम्ही फक्त तुमचेच कार्यकर्ते.तुम्हीच आमचे मायबाप असे दाखवून द्यावे लागत असे.कारण, ज्या व्यक्तीला ते आदरांजली वाहत होते , त्यांच्या पत्नीच्या मर्जीवर ज्यांची पदे अवलंबून होती, अशांनी दिलेली निष्ठा आणि भक्तीभावाची ग्वाही म्हणजे या जाहिराती असत.
घराणेशाहीच्या तत्वाने देशातील सर्वात महत्वाच्या पक्षाची कार्यपद्धती पोखरलीच , पण भारतीय लोकशाहीलाही तडा गेला.याचा एक परिणाम असा झाला की कार्यक्षमतेयेवजी चमचेगिरीच्या कसोटीवर उच्च पदांवर केल्या जाणाऱ्या नेमणुका.आणि दुसरा परिणाम म्हणजे इंदिरा गांधी यांनी काँग्रेससाठी घराणेशाहीचा तत्वाचा अंगीकार केल्यामुळे त्याचेच अनुकरण इतर पक्षांनीही सुरू केले.
उदा: कडव्या कार्यकर्त्यांची संघटना असलेल्या डाव्या तसेच उजव्या पक्षांचा - मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि भाजपा यांचा अपवाद वगळता, उर्वरित बहुसंख्य पक्षांना कौटुंबिक उपक्रमांचे स्वरूप आले आहे. मराठी अभिमान आणि हिंदू राष्ट्रवाद यांच्याशी बांधिलकीची भाषा करणारे बाळासाहेब ठाकरे , उत्तराधिकाऱ्याची निवड करताना त्यांचे पुत्र उध्दव यांच्या पलीकडे पाहू शकले नाहीत. आणि आता उद्धवजी ठाकरे सुध्दा त्यांच्या मुलाचे नाव महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे करीत आहेत.
या कॉंग्रेसच्या घराणेशाही धोरणामुळे संपुर्ण देशाची व्यवस्थाच बिघडली आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही.एकेकाळी देशाची एकात्मता असणारी काँग्रेस आज तिच्यामुळे देशात फूट पडली आहे, ती केवळ इंदिरा गांधी यांच्या घराणेशाही धोरणामुळे. अजून इतरही कारणे असतील.परंतु इतर पक्षांना कौंटुंबिक पद्धतीचे स्वरूप येण्यासाठी काँग्रेस पक्ष जवाबदार आहे. परिणामी काय झालं तर ह्या सर्व राजकीय संकुचित पणामुळे देशाच्या विकासात अडथळा निर्माण झाला. देशाची विकासाची गती मंदावली. या घराणेशाही पद्धतीमुळे ज्या व्यक्ती एखाद्या पदासाठी योग्य होत्या त्यांच्या जागी मर्जितल्या लोकांना बसवले गेले. त्यामुळे परिणामी काँग्रेसला देशाला योग्य नेतृत्व देता आले नाही. काँग्रेसमधील घराणेशाही पद्धतीमुळे पक्षातील कार्यक्षम नेते योग्यता असूनही डावलले गेले , त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते नाराज झाले.अशा वागणुकीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोबल खचले.काँग्रेस सरकारच्या काळात होणाऱ्या भ्रष्टाचाराला जनता वैतागली होती. याचा फायदा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी घेतला. काँग्रेस पक्षात असणाऱ्या घराणेशाही पद्धतीमुळे पक्षातील कार्यक्षम नेते डावलले गेले होते, आणि काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराला विरोधकांनी त्यांचा प्रचाराचा मुद्दा बनवून देश काँग्रेस मुक्त करण्याच्या घोषणा दिल्या.जनतेला अच्छे दिन येतील याचे स्वप्न दाखवून भाजपा पूर्ण बहुमत घेवून सत्तेत आली. 2014 मध्ये भाजपाने काँग्रेसला सत्तेततून पदच्युत केले. आणि आता या 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. ह्यावेळेसही भाजपाने पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले.
काँग्रेसला आता आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. इथुन पुढे गांधी परिवाराने पक्षातील निर्णय प्रक्रियेतून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. काँग्रेसने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी नवा चेहरा देणे गरजेचे आहे. पक्षाची सूत्रे योग्य आणि कार्यक्षम असलेल्या नेत्यांच्याच हाती देणे काँग्रेससाठी लाभदायक ठरणार आहे.काँग्रेसला पुन्हा नव्या दमाने उभे राहण्यासाठी पक्षाला नवीन चेहरा द्यावा लागणार आहे. जुने चेहरे बाजूला सारून नवीन नेतृत्व उभे करावे लागणार आहे. ज्यांची खरच योग्यता आहे अशांना संधी दिली पाहिजे. तरच काँग्रेस पक्षाचे काहीतरी होऊ शकते. ह्या 2019 वर्षांमध्ये हृतिक रोशनचा नवीन चित्रपट येत आहे.त्या चित्रपटात एक डायलॉग आहे " अब राजा का बेटा राजा नही बनेगा , राजा वही कहलायेगा जो उसका हकदार होगा" हा डायलॉग कोंग्रेस पक्षातील लोकांनी आणि त्याच बरोबर सर्वांनी अंगीकारला पाहिजे. हे सर्व भारताच्या संविधानामुळे सिद्ध होऊ शकते.नाहीतर राजाचा मुलगा राजाच झाला असता.त्या संविधान निर्माण कर्त्याला माझा सलाम.
काँग्रेसच्या ऱ्हासाला त्यांच्यात असलेली घराणेशाहीच कारणीभूत ठरली आहे. काँग्रेस मधल्या घराणेशाहीमूळे काँग्रेस देशाला योग्य नेतृत्व देऊ शकली नाही. त्यामुळे देशाचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय नुकसान झाले. काँग्रेस महात्मा गांधी, पटेल आणि नेहरूं यांना विसरली , यांच्या नितिमूल्यांना विसरली म्हणून आज ती अधोगतीला गेली.काँगेसला पुन्हा लोकशाही व विकेंद्रित असलेला पक्ष बनावे लागेल. तरच पुन्हा काँग्रेस पक्ष नव्या दमाने उभा राहू शकतो.
वैभव चौधरी.
शिरूर
दि.15/06/19
Comments
Post a Comment