शहरातील शिकलेल्या माणसापेक्षा जंगलात राहणार आदिवासी माणूस जास्त सुसंस्कृत ,प्रगल्भ आणि समजूतदार आहे- वैभव चौधरी
वाईज अँड अदरवाईज हे सुधा मूर्ती यांचं पुस्तक वाचत होतो.या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेल्या अनुभवांचं कथन आहे. या अनुभवकथनातील प्रत्येक लेख हा विचार करायला लावणारा आहे. याच पुस्तकातील ६ वा लेख आहे म्हताऱ्याकडून मिळालेला ज्ञानाचा वसा.
या लेखातील काही भाग मी इथे आपणाला वाचण्यासाठी देत आहे.या लेखात सुधा मूर्ती आणि त्या म्हताऱ्या माणसांमध्ये झालेला सवांद अंतर्मुख करणारा आहे. विचार मग्न करायला लावणारा आहे.ज्या प्रकारे त्या माणसाच्या बोलण्यानं सुधा मूर्ती विचार मग्न झाल्या त्याच प्रकारे वाचक ही विचार मग्न होतो. सुधा मूर्ती ह्या ओडीसा राज्यातील आदिवासी भागातील एका खेड्यात भेट द्यायला जातात तेव्हा त्यांची त्या गावातील एका म्हाताऱ्याशी भेट होते. त्यांच्यात झालेल्या संवादातून असं कळतं कि भारत देश स्वतंत्र झाला आहे हे भारतातील काही आदिवासी भागातील लोकांना कित्येक वर्ष माहीत न्हवतं.याचं खुप वाईट वाटतं.
त्या महाताऱ्याची साधी राहणी, साधं वागणं, साधं बोलणं हे शिकलेल्या लोकांना अंतर्मुख करायला लावणारं आहे.या लेखातील तो संवाद मी जसा चे तसा देत आहे.
मला एक म्हतारा माणूस भेटला .मी म्हतारा म्हणते आहे खरी... पण त्याचंसुद्धा वय नक्की किती असावं, ते सांगणं फार कठीण होतं.आमच्या संभाषणात त्याने ज्या काही घडलेल्या घटनांचे संदर्भ दिले, त्यावरून पाहता त्याचं वय सहज एकशे चार वर्ष असावं.
या म्हताऱ्याशी माझं संभाषण चांगलं रंगदार झालं. मी त्याला विचारलं, 'आपल्या देशावर कुणाचं राज्य आहे ?'
त्याच्या दृष्टीने 'देश' याचा अर्थ कलाहंडी (या शहरात तो राहत होता) एवढाच होता, हे उघडच आहे.
त्याने माझ्याकडे निरखून पाहिलं व माझ्या अज्ञानाला जरासा हसला. 'तुम्हाला माहीत नाही ? आपल्या देशावर 'कंपनी सरकार'चं राज्य आहे.' त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता 'इस्ट इंडिया कंपनी.' भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, याची त्या म्हताऱ्याला कल्पना न्हवती.
मग मी त्याला काही रुपयांच्या नोटा दाखवल्या व त्यांच्यावरील अशोकचक्र दाखवलं.
पण त्यांचा त्याच्यावर काही प्रभाव पडला नाही. ' हा तर नुसता कागदाचा तुकडा आहे. त्याच्याकडे पाहून थोडीच कळणार आहे, आपल्यावर कुणाचं राज्य आहे ते ? आपल्यावर गोरीवाली राणीचं राज्य आहे.'
इंग्लंडची ती 'गोरिवाली राणी' आता परत गेली आहे व तिचं आपल्यावर राज्य नाही हे मी त्याला पटवून देण्याचा कितीतरी प्रयत्न केला, पण त्याला काही पटेना.
आदिवासी जमातीमधे वस्तूंच्या दिवाणीघेवणाची पद्धत अस्तित्वात असते व ती खूप महत्वाची असते, याची मला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे मी मुद्दामच त्याला प्रश्न केला. 'हे पाहा, या लहानशा कागदाच्या तुकड्यातून तुम्हाला सरपण, खूप खूप साड्या, मिठाची गोणी, आगपेट्या..... अगदी जमिनीचा तुकडासुद्धा विकत घेता येऊ शकतो, याची तुम्हाला कल्पना आहे का ?'
त्यावर त्याने दया आल्यासारख्या थाटात माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला,
'या कागदाच्या तुकड्यासाठी तुम्ही आपापसांत भांडता, वाडवडीलांनी ठेवलेल्या जमिनीसोडून दुसरीकडे जाता. आपलं हे जंगल सोडून शहरात जाता. त्या कागदाच्या तुकड्याशिवाय आम्ही इथे इतकी वर्षे जगलोच ना ? आमचे वाडवडीलसुद्धा जगले. आम्ही देवाची लेकरे . या कागदाशिवाय इथे पिढ्यानपिढ्या सुखाने राहत आहोत. ही देवभूमी आहे. ही जमीन कोणाच्या मालकीची नाही.इथली कोणतीही नदी आम्ही बनवलेली नाही. कोणताही पर्वत आम्ही बनवलेला नाही. वारा आमची आज्ञा पाळत नाही. पाऊस कोसळण्याआधी आमची परवानगी विचारत नाही. या तर देवाच्या देणग्या. या भूमीची खरेदी-विक्री आम्ही कोण करणार ? मला हेच तुमचं समजत नाही. जर इथलं तुमचं काहीच मालकीचं नाही , तर मग हे देवाणघेवाणीचे व्यवहार तुम्ही कशाचा जोरावर करता ? तुमच्या या लहानशा कागदाच्या तुकड्यामुळे आमच्या आयुष्यात फार मोठी उलथापालथ घडेल.'
त्याला कोणत्या शब्दांत उत्तर द्यावं, ते काही मला समजेना. त्या क्षणापूर्वीपर्यंत माझी अशी समजूत होती की माझं ज्ञान त्यांच्या पेक्षा जास्त आहे.
चलनवाढ आणि घट, राजकीय पक्ष या सगळ्या गोष्टी आपण जाणतो. बिल गेट्स कोण आणि बिल क्लिंटन कोण हे आपल्याला नीट माहीत आहे. इथे या माणसाला कशाचीही माहिती न्हवती. पण त्याहीपेक्षा सखोल आणि चिरंतन असं सत्य तो जाणत होता. भूमी, पर्वतराजी आणि वाऱ्यावर कोणाची मालकी नसते हे त्याला माहीत होतं.
मग जास्त सुसंस्कृत कोण ? कलाहंडीच्या जंगलातील विद्वान म्हतारा की इंटरनेटच्या जगात वावरणारे आम्ही ?
वैभव चौधरी
Comments
Post a Comment